श्रुतिस्मृति न जाणताही वेदान्ताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही, संन्यासी ह्या संज्ञेला पात्र होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे, तो बोकेसंन्यासीच ठरणार. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीजागृति, संन्यासयोगाची किती सोपी युक्ति हा श्लोक सांगत आहे! आजच्या धामधुमीच्या काळी श्रुतिस्मृतिपारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी कितीजणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा, त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे. गुरुसेवा ही केवढी महान आहे! गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यासयोगी होऊ शकतो. उलट वेदान्ती केवढाही महान आचार्य असो, पण जर त्याचा गुरू ह्या संस्थेवर विश्वास नसेल, गुरुशिष्य परंपरा तो मानीत नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यासपदापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वत:ला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेषधारी संन्यासीच समजावेत. खरा संन्यासी व बोकेसंन्यासी ह्यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेषधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात. पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे. गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही. गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही. संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षूकही नसतो, तो दाता असतो. पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला पाच घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वत:च्या पोटाची खळगी भरायला नव्हे. रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्याजागी हजारोना जेवण देऊन तृप्त करीत. त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्यजनांपर्यंत पोहोचवीत. संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत. पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त, कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपापात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ! वेषधारी संन्याशांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे कांही कारण नाही. यथाशक्ति आदर करून मार्गाला लावावे. गुरुभक्ताला असे बोकेसंन्यासी काही अपाय करू शकणार नाहीत. त्याचबरोबर गृहस्थालाही चारी आश्रम प्रपंचांत राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून शंभर वर्षांचे टाइमटेबल करून ठेवले आहे. पहिली पंचवीस वर्षे विद्यार्जन, मग पंचवीस वर्षे वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणें, नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत होऊन शास्त्रांच्या अध्ययन-अध्यापनांत काळ कंठणे व अखेरची पंचवीस वर्षे संन्यासयोग म्हणजे संकल्पांचा न्यास. घरदार न सोडताही, प्रपंचांत राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरूच्या देहाची सेवा नव्हे, तर गुरुउपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय.
--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)