![](icons/Gurudev4.png)
![](PhotoGallery/biography/tai2.jpg)
महायोगी स्वामी उमानंद सरस्वती (जन्म ३१ डिसेंबर १९१६, नागपूर जवळील खामगाव येथील सुटाळा गाव,जिल्हा बुलढाणा) यांचा जीवनप्रवास कोणीही आश्चर्यचकित व्हावे असाच आहे. आय.ए.एस. ऑफिसरची उच्चविद्याविभूषित ,कर्तव्यदक्ष सहचारिणी म्हणून कार्यरत असतानाच आईवडिलांकडून लाभलेला आध्यात्मिक वारसा डोळसपणे जतन केला .स्वामी उमानंदांनी विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून इतरंकडूनही करवून घेतला. स्वामी उमानंदांमधील मातृत्व,पातिव्रत्य व गुरुत्व यांचा त्रिवेणी संगम आदर्श ठरून अनेक कुटुंबांना आकर्षित करता झाला. भक्तजन प्रेमाने स्वामी उमानंदांना 'ताई ' म्हणत.
![](PhotoGallery/biography/muktanand.jpg)
श्री मामासाहेब दांडेकरांनी भेटीच्या वेळी दिलेल्या सल्ल्यावरून स्वामींनी श्रीज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरु केला व पुढे १९६१पासून वेदांताचा अभ्यास स्वामी चिन्मयानंदांच्या मार्गदर्शनाखाली केला. १९६८ साली वयाच्या ५२ व्या वर्षी गुरुदेव मुक्तानंदबाबांची भेट झाल्यावर स्वामींचा आध्यात्मिक गुरूचा शोध संपला. गुरुदेव मुक्तानंदबाबांनी दीक्षा देऊन गुरुभक्ती योगमार्गाचे मार्गदर्शन केले. स्वामी उमानंदांनी गुरुभक्तीयोगमार्गाद्वारे परमोच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली. स्वामींचे जीवन म्हणजे अविरत मेहनत,अखंड तापस,उच्च कोटीचे वैराग्य व अनन्य भक्ती यांचे जिवंत उदाहरण आहे.स्वामींच्या कुंडलिनी जागरण करण्याच्या कुशलतेमुळे अनेक साधक आध्यामिक मार्गाला लागले. अशारीतीने स्वामी उमानंदांनी आध्यात्मिक जगतावर स्वतःचा असा वेगळाच ठसा उमटविला.
ताईंना म्हणजेच तेव्हाच्या ध्यानयोगिनी श्रीकुसुमेश्वरींना गुरुदेव मुक्तानंदबाबांनी योग्य साधकांना कुंडलिनी जागरण दीक्षा देण्याची आज्ञा केली. १९७५ साली श्रीगुरुदेव ध्यान मंदिर ट्रस्टची स्थापना करून भारतात मुंबईमधील अंधेरीच्या चकाला या भागात श्रीगुरुदेव ध्यान मंदिराद्वारे परिपूर्ण आध्यात्मिक कार्याला सुरुवात केली. तसेच श्री कुसुमेश्वरी प्रकाशन स्थापन करून आध्यात्मिक ग्रंथ प्रकाशनाचे कार्य सुरु केले. गुरुदेव मुक्तानंदबाबा अत्यंत गौरवाने स्वामी उमानंदांविषयी म्हणतात - ती एक उच्च दर्जाची योगिनी आहे. तिच्याद्वारे नित्यानंद बाबांची शक्ती कार्य करते. १५ मे १९७८ रोजी गुरुदेव मुक्तानंदबाबांनी ध्यानयोगिनी कुसुमेश्वरींना संन्यासदीक्षा देऊन स्वामी उमानंद सरस्वती हे नाव दिले.
![](PhotoGallery/biography/initiation.jpg)
स्वामी उमानंदांनी जगाला दाखवून दिले की खरा गुरु भक्तांकडून साधना करवून घेतो. स्वामींनी कुंडलिनी जागृत करून ज्ञान , साधना, सेवा आणि भक्ती या साधन चतुष्टयांचा उपयोग करून भक्तांना घडविले.साधकांना ध्यानाची गोडी लावून नियमितपणे ध्यान करण्याची सवय लावली.यासाठी भारतात विविध ठिकाणी गुरुभक्तीयोगासंबंधी ध्यानशिबिरे घेतली.हा ज्ञान मार्ग असल्याने भक्तांकडून ज्ञानी भक्ती होण्यासाठी श्रीज्ञानेश्वरी ,काश्मिर शैविझम ,अमृतानुभव,,वैचारिक क्रांती इत्यादी विविध विषयांवर अर्थगर्भ पण ओघवती प्रवचने दिली.
कठीण विषय सामान्यजनांना समजविण्याची स्वामी उमानंदांची हातोटी विलक्षण होती. गुरुभक्तीयोग म्हणजेच गुरुकृपा योग मार्गाचे, श्रीज्ञानेश्वरी व श्रीगुरुचरित्र हे अभ्यासग्रंथ आहेत.म्हणून या दोन ग्रंथांवर स्वामी उमानंदांनी विपुल लेखन केले. मराठीत श्रीगुरुचरित्र बोधेश्वरी हा गुरुचरित्रावरील विवेचनात्मक ग्रंथ तर इंग्लिश मध्ये ज्ञानेश्वरी एज अंडरस्टूड हा श्रीज्ञानेश्वरी वरील अनुभवसिद्ध ग्रंथ लिहिला. गुरुभक्तियोग साध्य होण्यास श्रीगुरुगीता साहाय्यक ठरते.मूळ पद्यमय असलेल्या संस्कृत श्रीगुरुगीतेवर स्वामींनी अनुभवसिद्ध आणि विवेचनात्मक असा श्रीगुरुगीतार्थेश्वरी हा ग्रंथ मराठी तसेच इंग्रजीतही लिहिला. आत्मज्ञान देते ती उमा. आत्मज्ञानाचा आनंद म्हणजे उमानंद. अशा रीतीने गुरुदेव मुक्तानंदबाबांनी दिलेले उमानंद सरस्वती नांव सार्थ केले.स्वामी उमानंदांनी युवा साधकांनाही बह्मविद्येची गोडी लावून जगाला पटवून दिले की प्रपंच व परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.तसेच लौकिक म्हणजे व्यवहारी जीवन जगत असतानाही त्यात आसक्त न होता मनुष्यजीवनातच पारमार्थिक अत्युच्च शिखरावर पोहोचता येऊ शकते हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले.
![](PhotoGallery/biography/Shikha.jpg)
अनन्य ज्ञानी गुरुभक्तीमुळे स्वामी उमानंद शिवाशी एकरूप झाल्या.शिवाची खूण म्हणजे त्याच्या मस्तकावरील शिखामुकुट ( उर्ध्व झालेल्या केसांचा मुकुटासारखा आकार).स्वामींचेही केस असेच उर्ध्व झाले आणि स्वामींच्या मस्तकावर त्यांच्याच केसांचा शिखामुकुट आपोआप तयार झाला .अशा रीतीने स्वामीजी महायोगी झाल्या. ह्या अनुभवाचे वर्णन श्रीज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात केले आहे.हे अद्भुत भक्तांनी तयार होतांना प्रत्यक्ष पाहिले आहे .
स्वामी उमानंदांनी प्रस्थापित केलेला ज्ञानी गुरुभक्तियोग हा गुरूची अनन्यभक्ती करून आध्यात्मिक प्रगतीची इच्छा असणाऱ्या भक्तांसाठी आहे, ना की लौकिक इप्सित प्राप्तीसाठी . प्रपंचाचा उपयोग परमार्थ साधण्यासाठी कसा करावयाचा हे स्वामी उमानंदांनी शिकविले .
महायोगी स्वामी उमानंद सरस्वतींनी १ मार्च १९८५ रोजी महासमाधी घेतली . स्वामी उमानंदांच्या इच्छेनुसार त्यांचे समाधीमंदिर श्रीक्षेत्र नाशिक येथे उभारले आहे .स्वामींच्या पूर्णाकृती मूर्तींची मुंबई व नाशिक येथे स्थापना करण्यात आली आहे. स्वामी उमानंदांनी कोणालाही उत्तराधिकारी नेमलेले नाही.स्वामींच्याच इच्छेनुसार सध्याचे कार्य स्वामींच्या दैवीशक्तीने भक्तगणाद्वारे चालू आहे .