पिंडे मुक्ता पदे मुक्ता रूपे मुक्ता वरानने
|
ज्याची कुंडलिनी शक्ति जागृत झाली आहे, ज्याचा हं स: मंत्राक्षरांत प्राण स्थिर झाला आहे व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूंत दर्शन झाले आहे व जो निरंजन, निराकार, निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त ह्यांत संशय नाही. कुंडल म्हणजे वेटोळे घालून असलेली साडेतीन वेढे असलेली दिव्य शक्ति. प्रत्येक व्यक्तीत मूलाधारांत पाठीच्या कण्याच्या खाली असते. तिला दोन मुखे असून एक बाहेरच्या जगांत इंद्रियभोगांत प्रवृत्त करते व दुसरे निवृत्त मार्गानि सर्व देह व्याप्त करण्यासाठी, मस्तकापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्ध्वगामी होण्यास गुरूच्या साहाय्याची अपेक्षा करून असते. गरुकृपेने साधक प्रवृत्तीचा निवृत्तिदास होतो व ज्ञानमार्गे आत्मसाक्षात्काराच्या मार्गास लागतो. पिंडातून मुक्त झाल्याची खूण म्हणजे कुंडलिनी जागृति. मी देह ही भावना मग जाते. मी तोच, हं स: हा सोऽहम् मंत्रच श्वासोच्छ्वासातून ध्यानांत विवक्षित अवस्थेत ऐकू येतो म्हणून हं सः मंत्राक्षरांत प्राण स्थिर होणे म्हणजे पदमुक्ति. नील बिंदु हेच वास्तविक गुरूचे निवासस्थान, तुरीया अवस्था होय. जागृति, स्वप्न, सुषुप्तीनंतरची चवथी अवस्था सविकल्प समाधि, जींत जग व जगदीश दोन्ही दिसतात. ह्या तुरीया अवस्थेपर्यंत ध्यान पोहोचणे म्हणजे नामरूपाच्या जगतापासून मुक्तता होणे. अशा ध्यानाचा परिपक्व परिणाम म्हणून साधक नंतर निरंजन, निराकार स्थिती प्राप्त करून घेतो; म्हणजे देह, नाम ह्यांच्या वर्चस्वांतून सर्वस्वी सुटतो, उपाधिरहित होतो. त्याच्या सर्व संकल्पांचा नाश होतो. दृष्टीसमोरील सृष्टि अजिबात नाहींशी होते. सर्वत्र प्रकाशाचा अफाट, अपार समुद्र पसरतो. त्यात त्याचे अस्तित्व, भान लोपून बुडून जाते. उन्मनी ध्यानाच्या ह्या निर्विकल्प समाधीपर्यंत साधक जाऊन पोहोचतो. तेथे ना रूप, ना नाम, ना व्यक्ति, ना सृष्टि. फक्त चिती शक्तिचाच विलास चाललेला असतो. असा अनुभव आलेल्यालाच निःसंशय मुक्त म्हणायचे. स्वात्मप्रकाशच सर्वांच्यांत व सर्व विश्वांत अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून असलेल्याची प्रत्यक्ष अनुभूति म्हणजेच निर्विकल्प समाधि. तुरीया अवस्थेत स्थिर झालेला व्यवहार व दर्शन दोन्ही एकाच वेळी करीत असतो तर उन्मनी अवस्थेची स्थिरता झाल्यावर ती सहज समाधि होऊन हवे तेव्हा व्यवहारासाठी तुरिया अवस्थेत येता येते व केव्हाही निर्विकल्प समाधीत विश्रांतीही घेता येते. समाधि म्हणजे काष्ठवत् देह, निरुपयोगी जीवन नव्हे. तर खरी परिपक्व पूर्ण समाधि म्हणजे पूर्ण समाधानाने सहज जीवन जगणे; प्रकाशांतून सुखाने वाटचाल करणे, अंधारांतले चाचपडत कष्टी जीवन पूर्णतया संपते. सूर्याप्रमाणे सर्व जगावर आत्मप्रकाश पसरवीत, चंद्राप्रमाणे सर्व जीवांना शीतलता देत, मेघाप्रमाणे सर्वांवर प्रेमाची वृष्टि करीत, आनंदाची कुबेरसंपत्ति सर्वत्र लुटत, असा समाधीयुक्त अवघाची संसार सुखाचा करून आनंदाने तिन्ही लोक भरून टाकतो. जीवन्मुक्त होऊन विदेही मुक्ति पण ह्याची देही साधतो.
--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)